Saturday 14 April 2012

ll महाशिवरात्री उपासना महिमा ll



सृष्टीचा निर्माणकर्ता श्री ब्रम्हदेव, पालनकर्ता श्री विष्णुदेव आणि संहारकर्ता श्री महादेव हे आहेत. म्हणूनच मृत्यू किंवा मोक्ष या वर श्री महादेवाचा अंकुश आहे असे म्हटले जाते. तसेच गतजन्मातील संचित पातकांमुळे आपणास या जन्मात आकस्मिक मृत्यू , मतीमंदत्व, मानसिक व शारीरिक आसाद्य आजार, दुखे:, संकटे, हालअपेष्टा किंवा दारिद्र्य भोगावे लागते. या सर्वां पासून मुक्ती देण्याचे कार्य श्री महादेव करतात. भगवान शंकर म्हणजेच खरे निर्गुण, निराकार परब्रम्ह होय.अशा या मोक्षकारी महादेवाला प्रसन्न करण्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. या दिवशी जो कोणी शिवाची उपासना करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो. एकूणच या दिवशी केलेली उपासना हि मानवी जीवनाला सुख शांती व समृद्धी देण्याचा एक राज मार्ग आहे, अशी हि फलदायी उपासना आहे.

आता तुम्ही विचाराल हि उपासना करतात कशी ?
ज्या कोणाला आपल्या जीवनात सुख शांती प्राप्त करावयाची आहे त्या प्रत्येक व्यक्तीने मग तो कोणत्याही जातीचा असो व धर्माचा असो त्याने हि उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे. व श्री महादेव म्हणजे सर्वात लवकर व साध्या पूजेने सुद्धा अति प्रसन्न होणारे दैवत आहे. म्हणूनच या देवाला भोळा शंकर असेही म्हटले जाते. एवढेच नाही तर आपल्या हातून अगदी अजाणते पणे जरी शिव पूजा घडली तरी हा भोळा शंकर लगेच प्रसन्न होतो. आणि उपासना करणे म्हणजे तरी काय ?

ज्या प्रमाणे आपण आपल्या प्रीय व्यक्तीस प्रसन्न करण्यासाठी किंवा खुश करण्यासाठी त्या व्यक्तीला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करतो किंवा त्या व्यक्तीला आवडणार्या वस्तू आपण भेट देतो त्याच प्रमाणे आपण ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करणे किंवा त्या देवतेला त्या गोष्टी अर्पण करणे किंवा भेट देणे म्हणजेच त्या देवतेची उपासना करणे असे होय.
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात त्याने भोळा महादेव लगेच प्रसन्न होतो. मग महादेवाला कोणत्या गोष्टी आवडतात ?

१) अभिषेक :- महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केल्याने हा भोळा शंकर लवकर प्रसन्न होतो. मग तो अभिषेक तुम्ही साधे पाणी, दुध, दही किंवा उसाचा रस या पैकी कोणत्याही द्रव्याने केलात तरी चालतो.

२) फुले :- महादेवाला पांढरी फुले अर्पण केल्यास तो लगेच प्रसन्न होतो. मग आपण पांढरी फुले मुख्यत्वे धोतर्याची फुले अर्पण करून महादेवाला प्रसन्न करू शकता.

३) वृक्ष :- महादेवाला बेलाचा वृक्ष तसेच चंदनाचा वृक्ष हे सर्वात प्रीय आहे मग तुम्ही महादेवाला बेलाची पानें किंवा फळे अर्पण करू शकता. तसेच तुम्ही एखादे बेलाचे झाडाचे किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करून ते जरी वाढवलेत व त्याची पूजा केलती तरी त्याचे पुण्य अपार आहे. म्हणून या दिवशी बेलाच्या किंवा चंदनाच्या झाडाचे रोपण करावे किंवा हि झाडे दान द्यावीत. त्याने भोळा शंकर प्रसन्न होतो.

४) फळे, धान्य किंवा वस्त्र :- कवठ हे फळ महादेवाला अतिप्रिय आहे तसेच बेल फळ किंवा नारळ हे देखील महादेवाला प्रीय आहेत. महादेवाला मुठभर तांदूळ अर्पण करावेत, किंवा केळी हे फळ महादेवाला अर्पण करावे. किंवा अगदीच काही नसेल तर खडीसाखर अर्पण करावी. तसेच शुभ्र वस्त्र महादेवाला प्रीय असल्याने ते देखील तुम्ही अर्पण करू शकता.

५) स्तोत्रे :- शिवस्तुती चा पाठ वाचवा. शिवस्तुती हि सर्वात लवकर फलदायी होते. याने महादेव लगेच प्रसन्न होतात. तसेच शिवकवच पठन हे देखील अत्यंत उपयुक्त आहे.

६) उपासना मंत्र :- ll ओम नम: शिवाय ll हा मंत्र अतिशय प्रभावी मंत्र आहे. या मंत्राच्या सतत च्या जपाने श्री महादेव लगेच प्रसन्न होतात. साधकाच्या सर्व मनो: कामना पूर्ण होतात. या मंत्राची शक्ती अद्भुत आहे. ह्या मंत्रासाठी दीक्षा, होम, संस्कार,मुहूर्त,गुरुमुखाने उपदेश इत्यादी कसलीही आवश्यकता नसते. या मंत्रात सर्व वेद व उपनिशिध्ये यांचे सार सामावले आहे.

७) दान धर्म :- सध्या कलयुग चालू आहे नि कलयुगात दान देणे हे अनन्य साधारण पुण्यकर्म समजले जाते, म्हणूनच श्री महादेवाला ज्या वस्तू प्रीय आहेत त्या पैकी कोणतीही एक वस्तू जर तुम्ही गोरगरिबांना दान केलीत तर त्याचे हि फळ लाखो पटीने वाढते. या मध्ये तुम्ही दुध, तांदूळ, केळी , खडीसाखर, पांढरे वस्त्र, नारळ, बेलाचे व चंदनाचे झाडांची रोपे या गोष्टी दान देऊ शकता. त्याने पुण्यसंचय वाढून जीवनात सुखसमृधी प्राप्त होते यात शंकाच नाही.

८) ध्यान आणि शांतता :- शंभू महादेवाला ध्यान व शांतता या दोन गोष्टी अत्यंत प्रीय आहेत. ज्या घरात रोज ध्यान धारणा होते व ज्या घरात कलह नसतो त्या घरावर महादेवाची अपार कृपा असते. म्हणून प्रत्येकाने रोज सकाळी अंघोळी नंतर दहा मिनिटे व रात्री झोपताना दहा मिनिटे महादेवाचे ध्यान करावे या वेळी घरात शांतता ठेवावी व चंदनाचा धूप लावावा त्याने अपार मानसिक व शारीरिक शक्ती प्राप्त होतात. व घरात बरकत होते. दारिद्र्य दूर होते.

९) मनातली इच्छा बोलणे :- ज्या प्रमाणे मुल रडल्यावर त्याची आई त्याला दुध पाजते म्हणजेच मुलाच्या इच्छेला आई लगेच प्रतिसाद देते त्याच प्रमाणे आपण या महादेवाची उपासना केल्यावर हा भोळा शंकर नक्कीच प्रसन्न होतो. नि हा प्रसन्न झाल्यावर आपण आपल्या मनातील इच्छा या देवतेस बोलून दाखवली तर ती नक्कीच पूर्ण होते असा आमचा अनुभव आहे. हि इच्छा आपण आपल्या मनात सतत घोळवावी त्याने फळ प्राप्ती लवकर होते.

खाली देलेली हि इच्छा एका कागदावर लिहून काढावी व रोज म्हणावी त्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

" हे शंकरा मी तुला शरण आलो आहे. साक्षात तूच माझा आत्मा असून, माझी बुद्धी म्हणजे पार्वती माता होय. माझे प्राण म्हणजे शिवगण आणि देह म्हणजे शिवालय आहे. सारे विषयभोग म्हणजेच तुमची पूजा असून झोप हि समाधी होय. माझे चालणे म्हणजे तुमची प्रदक्षिणा करणे, बोलणे म्हणजे तुमची स्तुती करणे असून मी जी जी कर्मे करतो ती सारी तुमची आराधनाच करतो आहे. माझ्या हात, पाय, वाणी,कान,डोळे,मन,देह या पैकी कशानेही जी पातके जाणतेपणी किंवा अजाणतेपणी घडली असतील त्या सर्वाना तू क्षमा कर. कारण तू दयेचा सागर आहेस. हे महादेवा तुझा जय जय कर असो ! "

विशेष सूचना :-
शिवपूजन कालावधी :- महाशिवरात्रीच्या मध्यरात्री म्हणजेच २४:३० ते २५:२० या कालावधीत वरील पैकी कोणत्याही प्रकारे आपण शिवपूजन केलेत तर महादेव प्रसन्न होतात. या काळात केलेले शिवपूजन लाखो पटीने फलदायी होते. या काळात शिवाची पूजा करावी त्यांना अभिषेक घालावा, बेलाची पानें अर्पण करावीत. कवठ या फळाचा प्रसाद म्हणून नैवेद्य अर्पण करावा. शिवाचे नामस्मरण करावे. शिवस्तुती किंवा शिव स्तोत्रे म्हणावीत. व मनातली इच्चा बोलावी. आपण जी इच्चा बोलाल ती पूर्ण होते असा आहे या महाशिवरात्रीच्या उपासनेचा महिमा.

वरील प्रकारे जर आपण शिवाची उपासना केलीत तर ऐहिक वैभव, स्वास्थ्य व मानसिक शांती लाभेल यात तीळ मात्रही शंका नाही. चला तर मग आता पासूनच उपासनेला सुरवात करून आपले व आपल्या कुटुंबियांचे जीवन सुख संपूर्ण बनवूयात.

ll हर हर महादेव ll

धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड.

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

No comments:

Post a Comment