Saturday 14 April 2012

ll हनुमान जयंती व हनुमान उपासना महिमा ll



चैत्र शु. पौर्णिमा हाच दिवस महाराष्ट्रात हनुमान जन्मदिन म्हणून सर्वत्र साजरा करतात. ( अश्विन वद्य १४ भूततिथीला चतुर्दशीला मंगळवारी सूर्योदय समयी अंजनीचे उदरी वानर रूपातील एका दिव्य व शक्तिवान बालकाने जन्म घेतला असे मतांतर आहे. ) चैत्र शु.पौर्णिमेलाच मंगळवारी या बालकाने या उगवणाऱ्या सूर्याला फळ समजून त्याला खाण्यासाठी आकाशात झेप घेतली. सूर्याच्या दिशेने उड्डाण करीत येणारा हा बालक राहू आहे असे समजून इंद्राने या बालकावर वज्राने प्रहार केला. त्यामुळे हनुमानाची हनुवटी छाटली गेली, तेव्हा पासून या बालकास हनुमान असे नाव पडले. इंद्राने प्रहार केल्याने हनुमान मूर्च्छा येऊन गलितगात्र झाला व धरणीवर येऊ लागला. त्या वेळी वायुदेव हा सर्व प्रकार पाहत होते व आपल्या या नवजात बालकावर झालेला अन्याय पाहून ते संतप्त झाले. त्यांनी हनुमानाला हवेतच झेलले व सुरक्षित स्थळी ठेवले. या वेळी संतापलेल्या वायू देवाने इंद्राला दंडित करण्यासाठी सर्व विश्वातील वायू संचार रोखून धरला. या मुळे सर्वत्र प्राणी व जीव वायू विना गतप्राण होऊ लागले. तेव्हा वायू देवांना शांत करण्यासाठी ब्राम्हदेवासकट सर्व देवांनी हनुमानाला निरनिराळे वर दिले व वायुदेवांना शांत केले. ब्रम्हा देवाने 'चिरंजीव' होशील व ब्राम्हास्त्राचा कोणताही वाईट परिणाम तुझ्यावर होणार नाही असा वर दिला. इंद्राने कोणत्याही शस्त्राने तुला मरण येणार नाही असा वर दिला. सूर्यदेवाने आपल्या शतांश इतके तेज हनुमानास दिले तसेच सर्व विद्या मध्ये पारंगत केले. वरून देवाने तुला पाश व जल या पासून अभय प्राप्त होईल असा वर दिला. यमाने यमदंडा पासून अभय दिले. कुबेराने गदा हे अस्त्र हनुमानास भेट म्हणून दिले. शंकरांनी सर्वत्र विजयी होशील असा वर हनुमानास दिला. असा हा हनुमान प्रभू श्रीरामचंद्रांचा सेवक म्हणून धन्यता मानत होता. आणि पुढे तो श्री रामभक्त हनुमान या नावानेच अजरामर झाला. जेथे जेथे श्री रामाचे नाव स्मरण केले जाते तेथे हनुमानाचा निवास असतो. महाभारतात यश प्राप्ती साठी पांडवानी हनुमानास त्यांच्या ध्वजावर विराजमान होण्याची विनंती केली होती नि हनुमानाने ती मान्य केली होती.

आता तुम्ही विचाराल हि उपासना करतात कशी ?
शक्तीचे आणि प्रगल्भ बुद्धीचे दैवत म्हणून हनुमानाची उपासना केली जाते. अडचणीच्या काळात मदतीला धावून येणारे दैवत म्हणजे हनुमान. साडेसातीच्या काळात शनी देवाच्या प्रकोपा पासून व मिळणाऱ्या वाईट फळा पासून आपला बचाव व्हावा म्हणून हनुमानाची उपासना करतात. ज्या कोणाला आपल्या जीवनात सुख शांती प्राप्त करावयाची आहे त्या प्रत्येक व्यक्तीने मग तो कोणत्याही जातीचा असो व धर्माचा असो त्याने हनुमानाची उपासना करणे अत्यंत आवश्यक आहे. या हनुमानाला शंकराचा रुद्र अवतार देखील संबोधले जाते. हनुमान उपासना करणे म्हणजे तरी काय ?

ज्या प्रमाणे आपण आपल्या प्रिय व्यक्तीस प्रसन्न करण्यासाठी किंवा खुश करण्यासाठी त्या व्यक्तीला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करतो किंवा त्या व्यक्तीला आवडणार्या वस्तू आपण भेट देतो त्याच प्रमाणे आपण ज्या देवतेची उपासना करतो त्या देवतेला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी आपण करणे किंवा त्या देवतेला त्या गोष्टी अर्पण करणे किंवा भेट देणे म्हणजेच त्या देवतेची उपासना करणे असे होय.
हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी खालील गोष्टी कराव्यात त्याने हनुमान लगेच प्रसन्न होतो. मग हनुमानाला कोणत्या गोष्टी आवडतात ?

१) श्रीराम नाम :- साध्या राम नामाच्या जपाने सुद्धा अतिप्रसन्न होणारे हे दैवत आहे. जो व्यक्ती रामनामाचा अखंड जप करीत असतो त्याच्यावर हनुमान लगेच प्रसन्न होतात. आणि त्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

२) फुले :- लाल रंगाची फुले हनुमंतास खूप प्रिय असतात.

३) वृक्ष :- रुई चे झाड

४) फळे, धान्य किंवा वस्त्र :- शेंदूर, तसेच लाल रंगाची वस्त्रे, लवंग, मोतीचूर लाडू , सफरचंद, तेल, गूळ खोबरे, शेंगदाणे या गोष्टी हनुमानास ( पर्यायाने गरिबांना दान दिल्यास ) भेट दिल्याने हनुमान प्रसन्न होतात.

५) स्तोत्रे :- हनुमान चालीसा पठणाने सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच बजरंग बाणाच्या नित्य पठणाने कामातील सर्व अडचणी दूर होतात.

६) उपासना मंत्र :- !! हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट !!

७) दान धर्म :- सध्या कलयुग चालू आहे नि कलयुगात दान देणे हे अनन्य साधारण पुण्यकर्म समजले जाते, म्हणूनच श्री हनुमानाला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या पैकी कोणतीही एक वस्तू जर तुम्ही गोरगरिबांना दान केलीत तर त्याचे हि फळ लाखो पटीने वाढते. या मध्ये तुम्ही दुध, तांदूळ, खडीसाखर, लाल वस्त्र, नारळ, मोतीचूर लाडू , सफरचंद, तेल, गूळ खोबरे, शेंगदाणे या गोष्टी दान देऊ शकता. त्याने पुण्यसंचय वाढून जीवनात सुखसमृधी प्राप्त होते यात शंकाच नाही.

८) ध्यान आणि शांतता :- श्री हनुमानाला ध्यान व शांतता या दोन गोष्टी अत्यंत प्रिय आहेत. ज्या घरात रोज ध्यान धारणा होते व ज्या घरात कलह नसतो त्या घरावर श्री हनुमानाची अपार कृपा असते. म्हणून प्रत्येकाने रोज सकाळी अंघोळी नंतर दहा मिनिटे व रात्री झोपताना दहा मिनिटे श्री हनुमानाचे ध्यान करावे या वेळी घरात शांतता ठेवावी व चंदनाचा धूप लावावा त्याने अपार मानसिक व शारीरिक शक्ती प्राप्त होतात. व घरात बरकत होते. दारिद्र्य दूर होते.

९) मनातली इच्छा बोलणे :- ज्या प्रमाणे मुल रडल्यावर त्याची आई त्याला दुध पाजते म्हणजेच मुलाच्या इच्छेला आई लगेच प्रतिसाद देते त्याच प्रमाणे आपण श्री हनुमानाची उपासना केल्यावर हे दैवत नक्कीच प्रसन्न होते. नि प्रसन्न झाल्यावर आपण आपल्या मनातील इच्छा या देवतेस बोलून दाखवली तर ती नक्कीच पूर्ण होते असा आमचा अनुभव आहे. हि इच्छा आपण आपल्या मनात सतत घोळवावी त्याने फळ प्राप्ती लवकर होते.

खाली देलेली हि इच्छा एका कागदावर लिहून काढावी व रोज म्हणावी त्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

" हे हनुमंता मी तुला शरण आलो आहे. माझ्या हात, पाय, वाणी,कान,डोळे,मन,देह या पैकी कशानेही जी पातके जाणतेपणी किंवा अजाणतेपणी घडली असतील तर तू मला क्षमा कर. कारण तू दयेचा सागर आहेस. माझ्या मध्ये जी शक्ती जे बळ संचारित होत आहे ती तुझीच कृपा आहे. तुझ्या कृपेने माझ्या कार्यातील सर्व अडचणी दूर होऊन मी हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात मला यश प्राप्ती होऊ दे ! हे हनुमंता माझे कार्यातील गुप्त शत्रू तसेच उघड शत्रू यांचा नाश कर ! तुझा जय जय कार असो ! "

विशेष सूचना :-
हनुमान पूजन कालावधी :- मंगळवारी तसेच शनिवारी मध्यरात्री पिंपळाच्या वृक्षा खाली बसून वरील पैकी कोणत्याही प्रकारे आपण शिवपूजन केलेत तर हनुमान प्रसन्न होतात. या काळात केलेले हनुमान पूजन लाखो पटीने फलदायी होते. या काळात हनुमानाची पूजा करावी त्यांना शेंदूर लावावा तसेच रुईची पानें अर्पण करावीत. गूळ खोबरे किंवा शेंगदाणे आणि गूळ हा प्रसाद म्हणून नैवेद्य अर्पण करावा. श्री रामाचे नामस्मरण करावे. रामस्तुती किंवा हनुमान चालीसाचा किंवा बजरंग बाणाचा पाठ म्हणावा व मनातली इच्छा बोलावी. आपण जी इच्छा बोलाल ती पूर्ण होते असा आहे या हनुमान उपासनेचा महिमा. ज्यांना हे शक्य आहे त्यांनी हे जरूर करून पाहावे. व ज्यांना रात्री करणे शक्य नाही त्यांनी दिवसा हि उपासना करावी यश नक्कीच मिळेल.

वरील प्रकारे जर आपण हनुमानाची उपासना केलीत तर कामातील अडथळे दूर होऊन आपणास ऐहिक वैभव, स्वास्थ्य व मानसिक शांती लाभेल यात तीळ मात्रही शंका नाही. चला तर मग आता पासूनच उपासनेला सुरवात करून आपले व आपल्या कुटुंबियांचे जीवन सुख संपूर्ण बनवूयात. भाग्यालीखीत परिवारातील आपणा सर्वांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

ll श्री राम जय राम जय जय राम ll
!! ओम दत्त चिले ओम !!

धन्यवाद !

आपला मित्र,
सचिन खुटवड.

संपर्क मो - ९९२१५२५५५७ 

No comments:

Post a Comment